पाय

पाय
सुधाकर आबांचा पाय गुडघ्यापासून कापणार,ही माहिती आयकून मन सुन्न झालं.मोठ्या कष्ठाने उभारलेल्या आयुष्याच्या सायंकाळी पाय कापावा लागणार म्हणजे खूपच वाईट.

मुद्दामहून भेटण्यासाठी मी औरंगाबादला गेलो.घाटी रुग्णालयात जनरल वार्ड खचाखच भरलेले होते.खाटावर जागा नसल्याने,आबांची तात्पुरती सोय गॅलरीत एका कोपऱ्यात केली होती.खाली सतरंजी अंथरून आबा व आबाई (माझ्या काकू) दोघे बसले होते. कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने,आबा घमेघुम झालेले होते.डावा पाय पुढे करून दोन्ही हातांनी बागायतदाराच्या साहाय्याने मानेवर व तोंडावर हवा मारत होते.डाव्या पायाच्या टाळव्याला भलेमोठे बँडेज बांधलेले होते.

मी आबा जवळ गेलो, फळांची कॅरी बॅग त्यांच्याजवळ ठेवून त्यांच्या समोर बसलो.आबांनी पायाकडे बघत खुणेनेच पाय कापणार असल्याचे सांगितले.काकू रडायला लागल्या,आबांचा चेहरा मात्र निर्विकार.
'कस काय झालं आबा ?' मी म्हटलं.
आबा शांत.
काकू म्हणाल्या,"धस्कट घुसल होतं. तळव्याच्या मधोमध,डायबिटीस हाय ना,बरच होईना. डॉक्टर म्हणता गुडघ्यापासून पाय कापावा लागेल."
मी म्हटलं,"आबा,सर सलामत तो पगडी पचास, पाय कापला तरी कृत्रिम पाय बसवता येतो.तुमचं सगळं काम तुम्हला करता येईल,काही काळजी करू नका,डॉक्टर सांगतील तसच करा",
पण येवढ्याच्या धस्कटने ही वेळ ?
आणि धस्कट घुसल कस?"
आबाई म्हणाल्या,"नवीन विहीर खंदली आहे ना,मग आबाला लै हुरूप,कोरड्या वावराला पाणी भरत होते.कडक उन्हाळयात पाणी इकडे सोडले की,दोन तीन तासाने खूप लांब अंतरावर बाहेर निघत होतं,त्यात लाईट येजा करती,वावर ओलून मका लावायची होती.महिनाभरापासून कसरत चालू हाय.घुसल धस्कट,डायबिटीस हाय,कुठं होत बरं,सगळा तळवा रिकामा झाला.फक्त हडक उरले.गुरुवारी पाय कापणार आहे."
मी जड अंतःकरणाने परत फिरलो.
रिकामं आणि अनावश्यक कामाची किती मोठी किंमत चुकवावी लागत आहे,शेतकऱ्यांना ना विमा ना इन्शुरन्स.

माणसाच्या आयुष्यात कधी काय बदल होईल सांगता येत नाही.

गुरुवारी पाय कापला असे गृहीत धरून मी त्यांना परत आठवडाभरात पुन्हा भेटायला गेलो.आबा जनरल वार्ड मध्ये कॉट वर झोपलेले होते. आबाई खाली झोपलेल्या होत्या.
मी आबाला उठवलं,म्हणालो आबा पाय कासाकाय आहे.कधी कापला मग?
आबाने पायावरच पांघरून काढून दाखवले,पाय तसाच होता,कापला नव्हता.

मी आश्चर्यने विचारले,पाय कापला नाही?
आबा हसून सांगू लागले,"गुरुवारी डॉक्टर पाय काढणार होते.पण बुधवारी एका पेशंटच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली.त्यामुळे डॉक्टरांनी संप केला.पाय कापायला राहून गेला. मला वाटलं पाय कापून लवकर मोकळं झालं असत तर बर झालं असत.वेदना सहन होईना.

पुढे संप मिटला,पण पाय कापायला सांगणाऱ्या डॉक्टरांची बदली झाली,त्यांच्या ऐवजी एक डॉक्टर मॅडम आल्या.नवीन होत्या,त्या म्हणाल्या मी पाय न कपात बरा करील.रोज स्वतः यायच्या स्वतः उपचार करायच्या,ड्रेसिंग करायच्या.आता जखम बरी होत आली."
मी आबाला म्हणालो,"सर सलामत तो पगडी पचास' पेक्षा "जाको राखे साइयां,मार सके न कोय.." हेच खरे ठरले.

Comments